Ad will apear here
Next
देवा तूचि ‘गाणे’शु
हैदराबादमधील २०१५मधील गणपती (फोटो : रागलहरी डॉट कॉम)दाक्षिणात्य गाण्यांनी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीवर वरचष्मा गाजवला आहे. बदलत्या काळात हैदराबाद आणि चेन्नई यांसारख्या दाक्षिणात्य भागांतील गणेशोत्सवही पुणे व मुंबईच्या बरोबरीचे ठरत आहेत. तेलुगू व तमीळ चित्रपटांमध्ये गणपतीच्या गाण्यांची संख्या वाढत चाललीय. या सर्व गाण्यांमध्ये ‘बाप्पा मोरया’चा मराठी जयघोष ऐकू येतो. त्यामुळे ‘जय भवानी-जय शिवाजी’नंतर महाराष्ट्राने दिलेला ‘बाप्पा मोरया’ हा आणखी एक वाक्प्रयोग ठरला आहे.
......
‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या न्यायाने दर वर्षी गणपती येतात. येताना वाजत-गाजत येतात आणि जाताना कित्येक पट जास्त वाजत-गाजत जातात. गणपती म्हणजे नाद, गणपती म्हणजे नाट्य आणि गणपती म्हणजे नृत्य. बुद्धी आणि भाषेची देवता असलेल्या पार्थिव गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत मूर्तिमंत विविध भारती उभी राहते. मराठी, हिंदीसोबतच तेलुगू आणि तमीळ अशा भाषांतील गाण्यांची रेलचेल या मिरवणुकीत असते. नव्हे, ही गाणीही या मिरवणुकीचे एक वैशिष्ट्य ठरली आहेत. यंदा कुठले गाणे वाजणार आणि कुठले गाजणार याचीही चर्चा असते. त्यातही यंदाच्या मिरवणुकीत कुठले दाक्षिणात्य गाणे धुमाकूळ घालणार, याचीच उत्सुकता जास्त.

मुळात ट, ठ, ड आणि ढ अशा मूर्धन्य अक्षरांचा सुकाळ आणि त्यात नाचायला बरी, यांमुळे दाक्षिणात्य गाण्यांनी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीवर वरचष्मा गाजवला आहे. त्यातही तेलुगू गाण्यांचे स्थान अव्वल. या गाण्यांच्या वाजण्याचा आणि गायब होण्याचा आढावा घेतला, तरी गणेशोत्सवाच्या बदलत्या स्वरूपाचे चित्र सहज उभे राहते.

गेल्या दोन दशकांपासून मी या मिरवणुकीत गाण्यांचा ‘ऐकीदार’ आहे. त्यात पहिल्यांदा आठवते ते नव्वदीच्या शतकातील ‘चक्का चक्का चेम चक्का’ हे गाणे. ‘अल्लुड मेकॅनिक’ या तेलुगू चित्रपटातील हे गाणे चिरंजीवी आणि विजयाशांतीवर चित्रित झालेले. खरे तर तो चित्रपट १९९३ सालचा - या दोघांचीही जोडी ऐन भरात असतानाचा. पुण्यात त्या वेळी सत्यनारायण असो किंवा गणेशाची मिरवणूक, त्यात हे गाणे हमखास लागायचे. या आठवड्यात आलेले गाणे पुढच्या आठवड्यात गप्पगार होण्याचा काळ अद्याप यायचा होता. त्यामुळे तीन वर्षांनंतरही ते गाणे ऐकू येण्यात काही नवल नव्हते. याच गाण्याच्या जोडीला कॉलेज चित्रपटातील ‘मायादारी मैसम्मा’ हे गाणेही जोरात होते. पट्टीच्या ‘नागीण डान्स’रांवर या दोन गाण्यांचे गारूडच होते म्हणा ना. किती तरी वर्षे ही दोन्ही गाणी मनःपूत वाजविण्यात आली. 

त्यानंतर काही वर्षांनी ‘आर्या’तील ‘अ अंटे अन्नापुरम्’ हे गाणे तुफान गाजले. याही गाण्याने एके काळी हजारो गणपतींचे कान किट्ट केले. तेलुगू भाषक चित्रपट असतानाही गैर-तेलुगू प्रदेशांमध्ये आक्रमक मार्केटिंग केलेला चित्रपट म्हणून या चित्रपटाची ओळख आहे. मग काही वर्षे तमीळमधील ‘गिल्ली’च्या ‘अप्पडी पोडे’ने घुमवले. त्यानंतर काही वर्षी ‘बंधू रामुडू’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’ या कन्नड गाण्यांच्या तालावर गणेशभक्त थिरकले. 

हळूहळू विसर्जन मिरवणुकीत डीजेचा शिरकाव झाला - शिरकाव नव्हे, शिरजोरी झाली. आवाज वाढविण्यासाठी नव्हे, तर कमी करण्यासाठी या मंडळींना (वा मंडळांना) आईची शप्पथ घालायची वेळ लोकांवर आली. त्यामुळे काय वाजतेय यापेक्षा किती जोरात वाजतेय, याला जास्त महत्त्व आले. ‘बांगो बांगो’ किंवा ‘मैं हूं डॉन’ ही गाणी आधीही वाजत होती. त्यात गाण्यांचे केवळ मुखडे वाजवून मध्येच त्याचे तुकडे पाडण्याचा अ‘सुरी’ प्रकार सुरू झाला. ताल आणि सुराला कान जरा कुठे सरावत नाही, तोच लपंडावाच्या खेळात भ्वॉ करावे, तसे दुसरे गाणे घुसडण्याचे प्रकार सुरू झाले. कर्कश्श आणि बेताल का असेना, पण पूर्ण गाणे ऐकणे हाही संगीतातीलच प्रकार आहे, याची प्रचिती वारंवार येऊ लागली. मग झिंगण्यासाठी फक्त थाळी किंवा ढोलसदृश कुठलेही आवाज चालू लागले. अर्ध्या ताटावरून उठावे, तसे अर्ध्या गाण्यावरच पाय हलविण्याची वेळ आली. काळ बदलत होता आणि भर्तृहरीच्या ‘सा रम्या नगरी’ वगैरेची आठवण येत होती. ‘कालाय तस्मै नमः’ म्हणायची वेळ आली होती.

...पण काळ फक्त महाराष्ट्रात बदलत नव्हता. ज्या तेलुगू-तमीळ गाण्यांची मैफल झाल्याशिवाय गणपती आपल्या गावाला जात नसत, त्या भाषांच्या प्रदेशातच बाप्पांनी बैठक मारली होती. एकविसाव्या शतकात बाप्पा ग्लोबल होत होते. आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू हे त्या ग्लोबल प्रवासातील मुक्काम होते. हैदराबादसारख्या शहरात तेथील स्थानिक राजकारणातून गणपतींचे प्रस्थ वाढले. तमिळनाडूत द्रविड राजकारणाच्या छायेतून बाहेर आलेल्या समाजाला आपले हक्काचे सांस्कृतिक प्रतीक मिळाले होते. आज हैदराबाद आणि चेन्नईतील गणेशोत्सव हे पुणे व मुंबईच्या बरोबरीचे ठरले आहेत. यंदा हैदराबादेत ६१ फुटांच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून एक नवा विक्रम रचण्यात आला आहे, तो उगीच नाही.

समाजातील या बदलांचे प्रतिबिंब चित्रपटांत न पडते तर नवलच. म्हणूनच तेलुगू व तमीळ चित्रपटांमध्ये गणपतीच्या गाण्यांची संख्या वाढत चाललीय. ‘उडन पिरप्पू’ या १९९३ साली आलेल्या चित्रपटात ‘एह सामी वरुदु’ या गाण्यापासून त्याला सुरुवात झाली. तमीळमधील २००८ सालच्या ‘विल्लू’ या चित्रपटातील नायकाच्या (विजय) इंट्रो साँगची पार्श्वभूमी गणपती विसर्जनाची होती. त्यानंतर गेल्या वर्षी आलेल्या ‘वेताळम्’ने गणेशगीताची उंची आणखी वाढवली. अजितवर चित्रित झालेल्या ‘वीर विनायक वेट्री विनायक’ या गाण्याने लोकप्रियतेचे उच्चांक मोडले. तेलुगूत १९९५ साली आलेल्या ‘कुली नं. १’ या चित्रपटात ‘जय जय जय विनायका’ हे गणपतीचे गाणे होते. दहा वर्षांपूर्वी आलेल्या सुपरस्टार चिरंजीवीच्या ‘जय चिरंजीवा’ चित्रपटात जय जय गणेशा हे गाणे असेच इंट्रो साँग होते. प्रभू देवाचा ‘एनिबडी कॅन साँग’ हा चित्रपट तेलुगू व तमीळ या दोन्ही भाषांमध्ये डब झाला. साहजिकच त्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचे गाणेही. त्यामुळे तर गणपतीच्या गाण्यांना आणखी वेगळा रंग चढला. याशिवाय खासगी गाण्यांची संख्या तर अगणित. 

गणपतीची गाणी आधीही होती आणि आताही आहेत. मग यात उल्लेख करण्यासारखे काय आहे? तर विशेष एवढेच, की या सर्व गाण्यांमध्ये ‘बाप्पा मोरया’चा मराठी जयघोष ऐकू येतो. शुद्ध मराठीतील ‘बाप्पा मोरया!’ असा...‘जय भवानी-जय शिवाजी’नंतर महाराष्ट्राने दिलेला हा आणखी एक वाक्प्रयोग. गाण्यांपासून सुरू झालेल्या भाषिक आदान-प्रदानाच्या प्रवासाने एक वर्तुळ पूर्ण केले आहे ते मराठीला सर्वत्र पोहोचवून. मराठीचा जयघोष देशाच्या काना-कोपऱ्यात पोहोचला आहे. ही सर्व बाप्पांची कृपा!

- देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZYFBG
Similar Posts
शपथ न घालता वाजणारा ‘डीजे’ गेल्या वर्षी चंदेरी पडद्यावर अवतरलेल्या दुव्वडा जगन्नाथम (डीजे) या तेलुगू चित्रपटाने त्या वेळी अंदाजे ११५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. निर्मितीखर्च होता ५० कोटी! आता याच ‘डीजे’च्या हिंदी आवृत्तीने यू-ट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. हिंदी भाषेत आलेल्या ‘डीजे’ने आतापर्यंत १० कोटी व्ह्यूज मिळविले आहेत. या
चतुरस्र लेखणी, सिद्धहस्त राजकारणी कलैग्नार अर्थात कला मर्मज्ञ अशी ओळख असलेले तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री डॉ. एम. करुणानिधी यांचे सात ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले. त्यांनी आपल्या लेखणीने सिनेसृष्टीला आणि आपल्या कर्तृत्वाने तमिळनाडूच्या राजकारणाला खूप मोठे योगदान केले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तिरंगा फडकवण्याचा मान त्यांच्यामुळेच मिळाला
वाढता वाढता वाढे... मराठीचा टक्का! सन २००१च्या जनगणनेच्या तुलनेत २०११च्या जनगणनेमध्ये मराठी ही मातृभाषा असलेल्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. म्हणजेच मराठी ही माझी मातृभाषा आहे, हे सांगणाऱ्यांची संख्या वाढते आहे. मराठी संपली, मराठी मृतप्राय झाली, अशी हाकाटी घालणाऱ्यांना ही चपराक आहे. भाषेच्या दृष्टीने विचार करण्यासारख्या आणखीही अनेक गोष्टी या अहवालात आहेत
हुळहुळलेल्या अस्मितेचा मायावी पुळका केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या शिफारशीनंतर हिंदी भाषेच्या विरोधातील सूर उमटला आणि जणू सगळ्याच दाक्षिणात्यांच्या भावना उफाळून आल्याचे भासवले गेले. ‘तमिळ लोक म्हणजे हिंदीविरोधी, त्यांची भाषिक अस्मिता हाच आदर्श आणि मराठी लोकांनी त्यांचा कित्ता गिरवावा,’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language